सीएसआर’ घेणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक
कंपनी कायद्यान्वये आतापर्यंत ऐच्छिक असलेला सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) आता अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या सामाजिक संस्था व धर्मादाय ट्रस्ट कंपन्यांच्या सीएसआर निधी अंतर्गत देणगी स्वीकारतात त्यांनी आयकर अधिनियम कलम १२अ तसेच ८० जी अन्वये आयकर विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
नुकत्याच केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी (सीएसआर) दुरुस्ती नियम २०२१ अंतर्गत २२ जानेवारी पासून नवीन तरतुदी लागू केल्या आहेत. नवीन नियमानुसार सामाजिक संस्था व धर्मादाय ट्रस्ट यांना १ एप्रिल पूर्वी कंपनी रजिस्ट्रार (आरओसी) यांच्या वेबसाईटवर ”सीएसआर -१” हा फॅार्म ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. हा फॅार्म भरल्यावर एक ”युनिक सीएसआर रजिस्ट्रेशन नंबर” आपोआप त्या प्रणालीतून निर्माण होईल. हा नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कोणतीही सामाजिक संस्था अथवा धर्मादाय ट्रस्ट सीएसआर निधी स्वीकारण्यास पात्र राहणार नाही. त्याचप्रमाणे कोणतीही कंपनी सीएसआर नोंदणी क्रमांक नसलेल्या सामाजिक संस्था व धर्मादाय ट्रस्टना सीएसआर निधी देऊ शकणार नाही. युनिक सीएसआर क्रमांकाची नोंदणी कंपनी कायदा कलम ८ अन्वये स्थापन झालेल्या कंपन्यांनी करणे सुद्धा आवश्यक आहे.
नवीन नियमानुसार सीएसआर निधीतून होणारा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र संशोधन व विकास प्रकल्प, क्रीडा शिष्यवृत्ती, पर्यावरण प्रकल्प यांना ही कालमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. सीएसआर निधी अंतर्गत होणाऱ्या कामाचा समाजजीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यास एक स्वतंत्र समिती गठीत करून त्या कामाचा नियमित पाहणी अहवाल सादर करणे गरजेचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अशा निधीमधून केवळ पाच टक्केच रक्कम प्रशासकीय कामावर खर्च करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. हे नवीन नियम व नोंदणी सद्या सुरू असणाऱ्या प्रकल्पांना लागू होणार नसून, २२ जानेवारीनंतर मान्यता मिळणाऱ्या प्रकल्पांना लागू होतील.
सीएसआर निधी स्वीकारणाऱ्या सामाजिक व धर्मादाय संस्थांची एकत्रित माहिती आता संकलित होऊ शकेल. त्या माध्यमातून पात्र व योग्य संस्थांकडेच हा निधी जात आहे व त्याचा विनियोग प्रस्तावित कामासाठीच होईल यावर देखरेख राहील.
हर्षद बर्गे संचालक टेंडर गुरु